आपला जिल्हा

भारत बंदच्या समर्थनार्थ गडचिरोलीत डाव्यांचे धरणे

निवडणुकांमध्ये भाजपचे सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १६ फेब्रु.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाचे सरकार देशातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, लहान दुकानदार, असंघटित कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे. धार्मिक, जातीयवादी, भांडवलदारांना फायदा व्हावा यासाठी गरिबांच्या विरोधात कायदे करून आवाज दडपण्याचा सपाटा चालविला आहे. त्यामुळे जनतेने न्याय मिळविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या सरकारला हद्दपार करावे, असे आवाहन विरोधकांनी धरणे आंदोलनादरम्यान केले.

संयुक्त किसान मोर्चा व कामगार कृती समिती यांनी केंद सरकारच्या जनहित विरोधी धोरणांविरोधात देशव्यापी ग्रामीण भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार भारत बंदच्या समर्थनार्थ गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भाजप सरकार विरोधी राजकीय पक्ष, शेतकरी व कर्मचारी आणि कामगार संगटनांच्या वतीने केंद्र धरणे आंदोलन करण्यात आले.

धरणे आंदोलन सभेचे अध्यक्षस्थान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. डॉ. महेश कोपूलवार होते. यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ. रमेश दहिवडे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जयश्री जराते, भाई शामसुंदर उराडे, बीआरएसपीचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, भाकपचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, काॅंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रमेश चौधरी, भरत येरमे, जावेद पठाण, राष्ट्रवादीचे इंद्रपाल गेडाम, प्रमिला रामटेके, संजय कोचे, कामगार संघटनेचे लतीफ पठाण, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, डॉ. साईनाथ कोडापे प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना खर्चाच्या दिडपट हमीभाव देण्यात यावा. व हमीभाव कायदा करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. शेती पंपासाठी मुबलक वीज पुरवठा करण्यात यावा.महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बोनस तातडीने वाटप करण्यात यावे. कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करण्यात यावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जावे. असंघटित कामगारांना किमान २६ हजार रुपये मानधन देण्यात यावे. ६० वर्षांवरील असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूरांना पेंशन योजना लागू करावी. तलाव, धरणावर सौर ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देवून मच्छीमार समाजाचे व्यवसाय संपविणे तातडीने थांबविण्यात यावे. प्री – पेड विद्युत मीटर रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पेसा व वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावा. लोह खाणी खोदण्यासाठी स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांवरील अन्याय करणे बंद करण्यात यावे. कोनसरी लोह प्रकल्पांसाठी बळजबरीने जमीन संपादन करणे थांबविण्यात येवून भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करण्यात यावी. मेडीगट्टा धरणग्रस्तांना न्याय देण्यात यावा. वडसा – गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून माती – मुरुमाचे उत्खनन करून शेती उध्वस्त करणे बंद करण्यात यावे.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व मृत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी. हत्ती, डुक्कर, निलगाय यासारखे वन्यप्राण्यांनी पीकांचे नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा स्थानिक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

आंदोलनात मोठ्या संख्येने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आणि शेतमजूर महिलांची उपस्थिती होती. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आले. आंदोलन यशस्वी होण्यासाठी शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, आकाश आत्राम, सुरज ठाकरे, काॅंग्रेसचे पिंकू बावणे, बीआरएसपीचे सतीश दुर्गमवार, प्रतीक डांगे, अशोक खोब्रागडे, प्रकाश रायपुरे, काॅ. धर्मराज सोरते, काॅ. प्रकाश खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!