विकास दूत शासन दरबारी पोहोचवणार गावातील समस्या
गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचा अभिनव उपक्रम
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१६ फेब्रु.
गावपातळीवर ग्रामस्थांना कुठल्या दाखल्यांची गरज आहे? गावात काय काय समस्या उद्भवतात, याची माहिती तातडीने मिळावी आणि त्यावर जलद गतीने कार्यवाही करता यावी यासाठी स्थानिक युवक आणि प्रशासन यांच्यात पुल निर्माण करण्याचा प्रयत्न अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आपल्या संकल्पनेतून सुरू केला आहे. यासाठी प्रत्येक गावात पाच सुशिक्षित विकासदुतांची नियुक्ती करण्याचे काम सुरू केले आहे. हे विकास दूत आता गावपातळीवर माहिती संकलन करून शासन दरबारी पोहोचवणार आहेत.
अहेरी उपविभागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा ही तालुके अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखली जातात. एवढेच नव्हे तर अहेरी आणि सिरोंचा हे दोन्ही तालुके विस्ताराने मोठे आहेत. तर भामरागड आणि एटापल्ली ही दोन तालुके नक्षलग्रस्त असून या तालुक्यातील बरीच गावे पावसाळ्यात संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात. अशा वेळी तालुका मुख्यालयात येऊन विविध दाखल्यांसाठी अर्ज करणे आणि वेळोवेळी त्रुट्यांची पूर्तता करणे शक्य नसल्याने बरेच जण या भानगडीत पडताना दिसत नाहीत. त्यामुळे आजही अनेक आदिवासी बांधवांकडे अनेक महत्त्वाच्या दाखल्यांची कमतरता आहे. परिणामी त्यांना लोककल्याणकारी योजनांचा लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
ही बाब मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवताना अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या लक्षात आली. ज्यांच्या घरी सुशिक्षित पालक आणि युवक आहेत त्यांच्याकडे काही प्रमाणात दाखले आहेत. मात्र, जे आजही अशिक्षित आहेत, ज्यांना आजही तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय माहीत नाही आणि ७० ते ८० किलोमीटरवर प्रवास करून तालुका मुख्यालयात येऊ शकत नाहीत, असे अनेक जण या परिसरात असून त्यांच्या वेळेवर उद्भवणाऱ्या समस्या तात्काळ प्रशासनापर्यंत पोहोचतील.
शासकीय योजनांचा लाभ द्यायचा असेल तर सर्वप्रथम त्यांना कुठल्या दाखल्याची गरज आहे, ते कसे प्रदान करता येतील याचा अभ्यास करून विजय भाकरे यांनी गावातील सुशिक्षित तरुणांना हाती घेऊन चर्चासत्र राबवून प्रत्येक गावात पाच विकास दूत नेमले. यासाठी भाकरे स्वतः गावखेड्यात थेट जनतेत गेले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तो समजावून सांगितला. ॲक्शन प्लॅन समजल्यावर विकासदुतांनी या कामाला स्वयंस्फूर्तीने सुरुवात केली. सुरुवातीला अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मंडळ कार्यालयांतर्गत देचली पेठा, कमलापूर व दामरंचा परिसरातील गावांचा समावेश असून उर्वरित तीन तालुक्यातही हा अभिनव उपक्रम क्रमाक्रमाने राबवण्यात येणार आहे.