वैनगंगा नदीत नाव उलटली, दोघींचा मृत्यू ,एकीचा वाचला जीव तर चार महिलांचा शोध सुरू
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ जानेवारी
मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्याची धक्कादायक घटना आज, मंगळवारी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली. त्यापैकी एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आले असून दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर चार महिलांचा शोध घेणे सुरू आहे.
सारूबाई सुरेश कस्तुरे असे वाचविण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर जिजाबाई दादाजी राऊत रा. गणपूर ता. चामोर्शी असे जलसमाधी मिळालेल्या महिलेचे नाव आहे. दुसऱ्या मृत महिलेचे नाव अद्याप कळाले नाही. तर रेवंता हरीचंद्र झाडे, मायाबाई अशोक राऊत, सुषमा सचिन राऊत, बुधाबाई देवाजी राऊत सर्व रा. गणपूर रै. या बेपत्ता आहेत.
प्राप्त माहितीनुसार गणपूर रै. व परिसरातील महिला चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात होत्या. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची अडचण आहे. त्यामुळे अनेक जण वैनगंगा नदीपात्रात नावेत बसून ये-जा करतात. दरम्यान, २३ जानेवारीला सकाळी नेहमीप्रमाणे सात महिलांना घेऊन नाव जात होती, पण ऐन मधोमध नदीपात्रात नाव उलटली, त्यामुळे त्यातील सातही महिला पाण्यात बुडाल्या. यावेळी नावाडी पाण्याबाहेर पोहून आला, त्याने एका महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला,यात त्याला यश आले परंतु दुर्दैवाने इतर महिलांना तो वाचवू शकला नाही. दरम्यान दोन महिलांचे प्रेत पाण्याबाहेर काढले असून उर्वरित चार महिलांना शोधण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव पथक शोध घेत आहे.