पर्लकोटा नदीला चौथ्यांदा पूर, भामरागड तालुक्यातील १२८ गावांचा संपर्क तुटला
जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०९ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात रविवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी सुद्धा सुरूच असून जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला महिनाभरात चौथ्यांदा पूर आला असून तालुक्यातील १२८ गावांचा संपर्क तुटला आहे.
मागील चोवीस तासांत जिल्हाभर मुसळधार पाऊस झाला. आरमोरी तालुक्यात सर्वाधिक ९३.४ मिमी, तर त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात ८८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, पर्लकोटा नदीला चौथ्यांदा पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला आहे. तसेच वैनगंगा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी- गोंडपिपरी, शिवणी गावाजवळील पोटफोडी नदी पूलावर पाणी वाहत असल्याने गडचिरोली- चामोर्शी तर पाल नदीवरून पाणी वाहत असल्यामुळे गडचिरोली- आरमोरी मार्ग बंद झाला आहे. शिवाय माडेमूल व कूंभी, तळोधी-. तळोधी- आमगांव- एटापल्ली -परसलगोंदी -गट्टा मार्ग, चातगाव-पोटेगाव मार्ग, कसनसुर- एटापल्ली -आलापल्ली, एटापल्ली -दुमणे व सिरोंचा- कालेश्वरम- वारंगल- हैद्राबाद मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ७ दरवाजे दीड मीटरने तर २६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून २ लाख ६८ हजार ९२४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शेजारच्या राज्यातील संजय सरोवर, मेडिगड्डा बॅरेज, श्रीपदा येलमपल्ली इत्यादी धरणांमधून पाण्याचा प्रचंड विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.