स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसची पदयात्रा
क्रांतिदिन ते स्वातंत्र्यदिनापर्यंत पदयात्रेचे आयोजन ; पत्रकार परिषदेत माहिती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०७ ऑगस्ट
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट करून हे स्वातंत्र्य मिळविणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कर्तबगारीचा इतिहास जनमानसात पोहोचावा व देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर हुतात्म्यांना नमन करता यावे, या उद्देशाने काँग्रेस पक्षाद्वारे देशव्यापी भारत जोडो हे अभियान राबविण्यात येत असून अभियानाच्या जनजागरणासाठी गडचिरोली जिल्ह्यात क्रांतिदिन ९ ऑगस्ट ते स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपर्यंत पदयात्रा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.
स्थानिक विश्रामगृहात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, भारत जोडो अभियानासाठी कुरखेडा ते गडचिरोली हा ७५ किमीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. कुरखेड्यापासून या अभियानाचा प्रारंभ होईल. दररोज १२ किमी पायी चालल्यानंतर वाटेतीलच एखाद्या गावात मुक्काम करण्यात येईल. यावेळी परिसरातील गावांना भेटी देत त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्याची माहिती देण्यात येईल. तसेच मागील ८ वर्षांपासून देशात सत्ता राबविणाऱ्या भाजपच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इडीसारख्या स्वायत्त संस्थांचा अनिबंध व सूडबुद्धीने वापर अशा अनेक बाबींची माहितीही देण्यात येणार आहे. या यात्रेदरम्यान कुरखेडा, वडसा, आरमोरी ते गडचिरोलीपर्यंत जिथे मुक्काम होईल. या अभियानात काँग्रेस कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष देवाजी सोनटक्के, अनुसूचित जाती विभागाचे रजनीकांत मोटघरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, रोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, सोशल मीडिया प्रदेश सचिव नंदू वाईलकर, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव भावना वानखेडे, जिल्हा सचिव सुनिल चडगुलवार, अनिल कोठारे, रमेश चौधरी, हरबाजी मोरे, भैय्याजी मुद्दमवार, सुरेश भांडेकर, निसार, ढिवरू मेश्राम, दीपक मडके, संजय वानखेडे, जावेद खान, गौरव एनप्रेड्डीवार, अनुप कोहळे आदी उपस्थित होते.