पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि ०५ ऑगस्ट
टीव्हीवरचे क्राईम शो पाहून एका ११ वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर येथे उघडकीस आली.
शाळेला दांडी मारल्याने पालक रागावू नये म्हणून त्याने स्वत:च्या अपहरणाची कहाणी तयार केली. मुलगा घरी पोहोचल्यावर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले असता त्यावर मुलाने आपले एका मालवाहू चालकाने अपहरण केले. आपण त्याच्या तावडीतून कसेबसे सुटलो अशी कहाणी सांगितली.
प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तिथेही या मुलाने हीच कहाणी वारंवार सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या गाडीचा नंबर व चालकाची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतरदेखील तपास पथकाच्या हाती सुगावा लागला नाही. मुख्य म्हणजे अपहरण झालेला मुलगा प्रत्येक वेळी अपहरणाची तीच स्टोरी कुठेच न चुकता सांगत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. अखेर आम्ही मुलाला विश्वासात घेऊन खरं काय झालं ते वदवून घेतलं. काही तासांनी त्या मुलाने शाळेत न गेल्याने पालक रागावू नये यासाठी अपहरणाचा बनावट केल्याचे कबूल केले.
मुलाच्या या पराक्रमाने पालकही बुचकाड्यात पडले. अगदी सहज पाहायला मिळणाऱ्या टीव्हीवरील क्राईम सिरीयल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केला याचे हे ताजे उदाहरण म्हणायला हवे.