शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसची झाडाला धडक
महिला वाहक गंभीर तर चालकासह दोन विद्यार्थी जखमी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ ऑगस्ट
शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील बसचा मुलचेरा तालुक्यातील लगाम मार्गावर भीषण अपघात झाल्याने महिला वाहक गंभीर व चालक जखमी तर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कल्पना नामदेव मेश्राम व रमेश म्युक्यालू गोगलू असे जखमी महिला वाहक व चालकाचे नाव आहे. किरकोळ जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी खासगी रुग्णालयात उपचार केले.
अहेरी आगारातून शालेय विद्यार्थ्यांकरिता मानव मिशन विकास अंतर्गत बसेस चालविण्यात येतात. मुलचेरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अहेरी आगारातून ४ ते ५ बस चालवले जातात. सकाळी अहेरी-लगाम-मुलचेरा परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एमएच ०७ सी ९४६५ क्रमांकाची बस लगाम मार्गावरील मल्लेरा गावाजवळील नाल्याजवळ अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. या बसमध्ये १६ विद्यार्थी होते. यातील दोन विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या. तर महिला वाहकाला व चालकाच्या पायाला जोरदार मार लागल्याने त्यांना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरजागड खाणीतील लोहखनीजाच्या वाहतुकीमुळे या भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे इतर वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहे.