सती नदीत आढळला पोलीस शिपायाचा मृतदेह
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ ऑगस्ट
आजार आणि मानसिक तणावातून घरून निघून गेलेल्या कोरची तालुक्यातील बेळगाव पोलिस मदत केंद्रातील पोलिस शिपायाचा मृतदेह गुरुवारी सकाळी कुरखेडा तालुक्यातील पुराडा गावा नजीकच्या सती नदीच्या पुरात आढळून आला. प्रताप सुंदरसिंह गावळे असे मृत शिपायाचे नाव आहे. गावळे ते अलीटोला या गावचे मूळ रहिवासी होते.
प्रताप गावळे हे २८ जुलैपासून बेपत्ता होते. याविषयीची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांना बेळगाव पोलिस मदत केंद्रात केली होती. ते आजारी आणि मानसिक तणावात होते. त्यामुळे ते कोणतीही सूचना न देता घरून निघून गेले, असे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. आज पुरा गावानजीकच्या सती नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली की कसे, याविषयीचा उलगडा पोलिस तपासात होणार आहे. पुराडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रल्हाद कोडापे घटनेचा तपास करीत आहेत.