गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया ठरताहे वादग्रस्त
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात ऐकावे ते नवलच
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क ,गडचिरोली, दि २१ जून
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात ऐकावे ते नवलच अशी स्थिती दिसून येत आहे.विद्यपीठातील मनमानी कारभाराचा रोज एक नवीन नमुना पूढे येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीचा घोळ पूढे आला तर मागील आठवड्यात कुलगुरू आणि प्र- कुलगुरू हे सदर पदासाठी अपात्र असल्याचा मुद्दा पुढे आला. आणि आता विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया नियम आणि कायदे धाब्यावर बसवून केली जात असल्याचे निष्पादित झाले आहे. विद्यापीठात एकूण ३० सहाय्यक प्राध्यापकांची भरती करताना कोविड मुळे स्थगित करण्यात आलेल्या तीन वर्षांपूर्वीच्या प्रक्रियेला डावलून नव्याने प्रक्रिया राबविली जात आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचे काळात २०२० मध्ये २८ सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिरात देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. यात मुलाखती घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सक्षम मुलाखत घेणाऱ्या तीन तज्ञांची निवड एकॅडेमिक कौन्सिल आणि मॅनेजमेंट कौन्सिल मार्फत करुन ती लिफाफ्यात बंद करण्यात आली. त्यानंतर मुलाखतींचा कार्यक्रम राबविण्याचे वेळी कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे तिला स्थगित केले गेले.
नवीन कुलगुरूंना जुन्या समितीतील तज्ञ का चालत नाही?
कोवीड मुळे स्थगित करण्यात आलेली भरती प्रक्रिया पुन्हा घेताना नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी करण्यात आली किंवा आरक्षणाचे नवे २०० बिंदूचे रोस्टर आल्यामुळे नवी जाहिरात प्रसिद्ध करणे समजू शकते. परंतू लिफाफाबंद तज्ञांची समिती कुलगुरूंना कां चालत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर लिफाफाबंद तज्ञांची समिती नव्या कुलगुरूंच्या इशारावर काम करीलच असे नाही. त्यामुळे कदाचित अपेक्षित प्राध्यापकांची निवड होणार नाही. ही भीती असल्याचे सुत्रांकडून समजते.
तीन वर्षांनंतर नव्याने आलेल्या कुलगुरूंनी ती प्रक्रिया पूढे नेण्याऐवजी नव्याने राबविणे सुरू केले. जेव्हा की जूनी प्रक्रिया रद्द करण्यात आली नाही. ती केवळ स्थगित केली गेली. त्यामुळे स्थगित प्रक्रियेऐवजी नव्या प्रक्रियेची गरज काय असा गंभीर प्रश्न उच्च शिक्षण क्षेत्रातील एका तज्ञ व्यक्तीने विचारला आहे.
सुटीच्या दिवशी मुलाखतींचा घाट
२४ जूनपासून २०२३ पासून अंतिमतः पात्र उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया ३० जूनपर्यंत चालणार आहे. २५ रोजी रविवार आहे तर २९ रोजी बकरी ईदनिमित्त शासकीय सुटी आहे. मात्र, या दिवशीही मुलाखती ठेवल्या आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठात भरती प्रक्रिया बंद आहे, परंतु गोंडवाना विद्यापीठ त्याला अपवाद आहे. सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. २४ ते ३० जून दरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठेवला आहे. मुलाखत समितीत कुलगुरु, तीन विषय तज्ञ, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शिक्षण संचालक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी अशा ९ जणांचा समावेश असतो. गोंडवाना विद्यापीठाच्या तत्कालीन विद्यापरिषदेने ५ मे २०२० रोजी ठराव घेऊन बाहेरच्या विद्यापीठातील सहा विषयतज्ज्ञांची नावे सुचविली. त्यानंतर व्यवस्थापन समितीने त्यापैकी तीन नावे अंतिम केली. ही नावे लिफाफाबंद असून कुलगुरुंकडे आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर डॉ.श्रीनिवास वरखेडी हे प्रभारी कुलगुरू म्हणून आले, त्यांनी काहीही केले नाही . मात्र नव्याने पूर्णवेळ आलेले कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी ही प्रक्रिया सुरू केली. दरम्यान तीन वर्षांपूर्वी २२ पदांंसाठी भरती प्रक्रिया राबविली होती त्यात ८ जागा रिक्त झाल्याने आता ३० जागांसाठी भरती सुरू केली आहे. उल्लेखनीय आहे की विद्यापीठाने कोणत्याही कामासाठी एखाद्या विशेषज्ञांची समिती विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने वैध मार्गाने स्थापन केली तर त्या समितीचे कार्य पूर्ण होऊन अंतिम अहवाल सादर करेपर्यंत तिची वैधता कायम असते. केवळ कुलपतीच विशेषाधिकार वापरून अशा समितीला रद्द किंवा निरस्त करु शकतात. प्राप्त माहितीनुसार राज्यपालांनी लिफाफाबंद असलेल्या समितीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत कुलगुरूंनी नव्याने स्थापन केलेल्या तज्ञांची वैध कशी काय ठरु शकते हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भरतीची सर्व प्रक्रिया नव्याने केली जात आहे.
रिक्त पदांच्या भरतीची सर्व प्रक्रिया नव्याने केली जात आहे. जूनी प्रक्रिया रद्द करण्याची आणि नवी प्रक्रिया सुरू करण्याची मान्यता कुलपतींकडून घेतल्या नंतरच ही भरती केली जात आहे. कुठल्याही निवड समितीला सहा महिन्यांची मुदत असते, त्यानंतर अशी समिती आपोआप निरस्त होते अशी माझी माहिती आहे. त्यामुळे नव्याने प्रक्रिया राबवून विषयतज्ञ निवडले.
– डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ