आरमोरी पोलिसांनी बुजविले १२ किमी रस्त्यावरील खड्डे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ जुलै
आरमोरी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील ठाणेगाव ते वसा या गावापर्यंतच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांनी आपल्या ४० पोलीस व होमगार्ड या कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने ठाणेगांव ते वसा या १२ किमी रस्त्यावरील खड्डे चुरीमुरूम टाकून बुजविण्यात आले.
ज्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते, त्या ठिकाणी जेसीबी लावून खड्डे बुजविण्यात आले. पहिल्या टप्प्यातील मोहीम सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल सहा तास हे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. या कार्याबद्दल आरमोरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
खड्डे बुजविण्याच्या या श्रमदान कार्यात पोलीस निरीक्षक काळबांधे, सहाय्यक फौजदार रवींद्र चौके, देवराव कोडापे, पोहवा. एकनाथ घोडाम, रामेश्वर चवारे, लक्ष्मण नैताम, प्रशांत वऱ्हाडे, केशव केंद्रे, पोलीस नाईक वसंत जौंजाळकर, नरेश वासेकर, अकबरशहा पोयाम, रमेश लिंगायत, रजनीश पिल्लेवान, उमेश टाटपलान, पतिराम मडावी, पो. शि. प्रवीण धांदरे, अतुल सेलोटे, अभय रंगारी, ज्ञानेश्वर सिडाम, वेणूताई हलामी, सरस्वती दर्रो, होमगार्ड अतुल भोयर, राजू रामटेके, प्रेमदास मातेरे, कमलाकर ढोरे, सुरेंद्र शेंडे, मधुकर ढोणे, लीलाधर मने, विश्वनाथ चुधरी, टिकाराम मुरांडे, तुषार तितीरमारे, होमराज देशमुख, तुळशीदास रामटेके, नरेंद्र बांबोळे, देवराव केळझरकर यांनी सहभाग घेतला.