पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै
ज्या शेतकऱ्यांची धान पिकाची रोपे सततच्या पावसामुळे खराब झाली असल्यास त्यांनी धान दुबार लावणी करण्यासाठी धान पेरीव पद्धतीने लावणी करावी किंवा चिखल पऱ्हे पद्धतीने कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागणी करावी. रोपवाटिका गादीवाफ्यांवर लावावी. कापूस व भातपिकाची दुबार पेरणी करताना कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पूरपरिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतातील पिके खरडून गेली. आता शेतकऱ्यांजवळ बियाणे उपलब्ध नाही. अशास्थितीत पैशाची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यासाठी भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
अशी घ्या पिकांची काळजी
पाच दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी धान पिकाची रोपे तयार असतील तर धान पिकाची रोवणी करणे सुरु करावे. जर रोपांची वाढ किंवा दिवस जास्त झाले असल्यास रोपांचे शेंडे खुडून रोवणी करावी. काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने खरीप पिकांतील आंतरमशागतीची कामे व कीटकनाशक व तणनाशकाची फवारणी पुढे ढकलावी. पुढील पाच दिवसांची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी भाजीपाला, कपाशी व कडधान्ये पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशा व्यवस्थापनासाठी पिकांमध्ये चर काढावी. पेरणी केलेल्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. वेळेवर पेरलेल्या सलग तुरीच्या शेताचे नियमित निरीक्षण करावे. रोपावस्थेत मररोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन वेळेवर पेरणी केलेल्या तूर पिकामध्ये निंदणी करावी व पीक तणविरहित ठेवावे.
कापूस पिकाकरिता पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कपाशीच्या ३ शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चरी काढाव्यात. मर वा मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाऊस उघडल्यानंतर मर झालेल्या रोपांच्या जागी नांग्या भराव्यात; तसेच जास्तीच्या रोपांची विरळणी करावी. दुबार पेरणी करताना बीबीएफ प्लांटरचा वापर करावा.