रेगुंठा परिसरातील १७ गावे २० दिवसापासून अंधारात
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै
सततचा पाऊस आणि पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील रेगुंठा परिसरातील बामणी येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येते. मात्र, तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने परिसरातील १७ गावांचा वीजपुरवठा तब्बल २ जुलैपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी या भागातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावे लागत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून असलेली पूरस्थिती आणि बंद असलेले मार्ग यामुळे खंडित झालेल्या वीजपुरवठ्यातील बिघाड दुरूस्त करणेही महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे रेगुंठा, मोयाबिनपेठा, नरसिंहपल्ली, कोटापल्ली, येल्ला, पिरमिडा, परसेवाडा, चिक्याला, बोगोटागुडम, दरसेवाडा, मुल्लाडीमा, विठ्ठलरावपेटा, बोंडरा, ओड्डूगुडम, रामनपेटा, झेंडा आणि पापयापल्ली या १७ गावातील विद्युत पुरवठा बंद आहे. अशा परिस्थितीत मागील १८ दिवसांपासून या गावांतील नागरिक वीजपुरवठ्याशिवाय कसे राहात असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.