डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू प्रकरणी डॉ. सतिश जांभूळे निलंबित तर टीएचओ डॉ. धिरज मडावीला शोकॉज
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ डिसेंबर
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश जांभूळे यांना निलंबित करण्यात आले असून धानोरा तालुका आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
धानोरा तालुक्यातील मौजा कारवाफा येथील साधना संजय जराते हीचा कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रीयेदरम्यान डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुबार शस्त्रक्रिया करतांना दुर्दैवी मृत्यू झाला असून या जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचे सह विरोधक आणि सत्तापक्षातील अनेक आमदारांनी सदनात लावून धरली होती. यावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
८ डिसेंबरला डॉ. धीरज मडावी आणि त्यांच्या पथकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बेत खालावल्याने साधनावर १० डिसेंबरला शासकीय महिला रूग्णालय, गडचिरोली येथे डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा शस्त्रक्रिया करताना साधना जराते या २३ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यु झाला. व त्यांची १ आणि ४ वर्षाची मुले पोरकी झाली. या प्रकरणात महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दावल साळवे हेही रडारवर असल्याचे समजते.