गडचिरोलीत मराठा, खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाची स्थिती दयनीय
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी व्यक्त केली खंत. दोन दिवसांत १ लाख ९२ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ जानेवारी
गडचिरोलीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सुरू असलेल्या सर्वेक्षणाची स्थिती दयनीय असून काही तालुक्यात प्रगणकांचे काम निराशाजनक आहे. या सर्वेक्षणाची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. विहीत मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याने त्यांनी विहीत मुदतीत सर्वेक्षण पूर्ण करावे, असे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी प्रशासनाला दिले. ते सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यकक्षेनुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह ९ सदस्यांची नियुक्ती केली असून राज्य सरकारने सर्व सदस्यांना राज्यभरातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय दौरे करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या काम काजाकरिता २७ ते ३१ जानेवारीदरम्यान नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा आढावा घेतला.
गडचिरोली जिल्ह्यात १५३८ गावे असून २ लाख ७८ हजार ४७४ कुटुंब संख्या आहे. त्यापैकी सोमवारपर्यंत १ लाख ६ हजार ५४३ म्हणजे निम्म्याहून कमी कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. म्हणजेच १ लाख ७१ हजार ९३१ कुटुंबांचे सर्वेक्षण बाकी आहे. हे आगामी दोन दिवसांत कसे करणार असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांमध्ये मराठा व खुल्या प्रवर्गात १४५० कुटुंब दिसून आले आहेत. तर आरक्षित प्रवर्गात १ लाख ५ हजार ४३ कुटुंब आढळून आले आहेत. एकूण १८२८ प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.