मुळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले पत्र

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१८ जुलै
गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( मुळ, शरद पवार) गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदावर सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी मुंबईत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी गण्यारपवार यांना त्यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले. या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात एका प्रभावी राजकीय नेतृत्वाला आव्हानात्मक संधी मिळाली आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी फुट पाडून भाजपची कास धरली. त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांचेसह अनेक मातब्बर नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली. यात गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मानले जाणारे आमदार धर्मराव आत्राम यांनीही अजित पवारांची साथ देत मंत्रीपद बळकावले. धर्मरावांचे समर्थक आणि जिल्हाध्यक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुळ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नुकताच गडचिरोलीत पार पडला. त्यात मुळ राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मेळाव्यात बोलताना आगामी काही दिवसांत जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती केली आहे.त्यांच्या नियुक्तीचे जिल्ह्यात स्वागत केले जात आहे.