आपला जिल्हा

हमालांच्या निष्काळजीपणामुळे गेला निकृष्ट तांदूळ! ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा आश्चर्यजनक अहवाल

राज्य शासनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला खडसावले ; पोलीसांमार्फत चौकशी करण्याचे दिले आदेश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ जुलै

मनुष्यास खाण्यास अयोग्य असलेला निकृष्ट तांदूळ पुरवठा केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी शासनास पाठविलेल्या अहवालात हमालांच्या निष्काळजीपणामुळे आरमोरीच्या गोदामातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ ट्रकमध्ये भरण्यात आला, असे म्हटले आहे. यावर आश्चर्य व्यक्त केले जात असुन ही बाब संयुक्तीक वाटत नाही. संबंधित हमाल कोणाच्या नियंत्रणाखाली काम करीत होते. याचा खुलासा करावा, असे शासनाने बजावले आहे. या संदर्भात संपूर्ण चौकशी अहवाल न पाठविल्याप्रकरणी राज्य शासनाने गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना खडसावले असून, पोलीसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्र शासनाच्या एका पथकाने पणन हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील काही राईस मिल आणि गोदामांची तपासणी केली होती. या तपासणीत मायाश्री फूड इंडस्ट्रिज वडसा, मायाश्री एग्रो इंडस्ट्रिज वडसा, मायाश्री राईस इंडस्ट्रिज वडसा, जनता राईस मिल आरमोरी व एमएससीटीडीसी गोदाम आरमोरी यांच्याकडे मनुष्यास खाण्यास अयोग्य तांदूळ आढळून आला होता.

यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे तत्कालिन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एसआयटीमार्फत चौकशी करुन फोजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कंत्राटदार कंपनी आणि राईस मिलधारकांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनीही यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. डॉ. फुके यांच्या लक्षवेधी सूचनेवर राज्य शासनाने सविस्तर अहवाल मागितला होता. परंतु जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तो अद्यापही शासनास सादर केला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, तत्काळ अहवाल सादर करण्यास शासनाने बजावले आहे.

आ. प्रवीण दरेकर आणि आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्रानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एक अहवाल पाठविला होता. त्यानुसार आरमोरी येथील गोदामातून गडचिरोली येथील शासकीय गोदामात पाठविलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा होता हे स्पष्ट होते. परंतु नेमका किती लॉट निकृष्ट तांदूळ जमा केला आणि संबंधित मिल मालकांवर कोणती कारवाई केली, याविषयीचा उल्लेख अहवालात नाही, याबाबत राज्य शासनाने तीव्र नाराजी व्यक्त करुन खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. शिवाय आरमोरीच्या गोदामात जमा केलेला सीएमआर तांदळाची माहिती, गुणनियंत्रकाचे नाव, निकृष्ट तांदळाची विल्हेवाट कशी लावली, शासनाचे नुकसान झाले किंवा कसे, एकूण जमा केलेला तांदूळ, मिलर्सच्या नावांची यादी, त्यांना भरडाईसाठी दिलेला लॉट, त्यांनी प्रत्यक्षात जमा केलेला तांदूळ अशी संपूर्ण माहितीही पुन्हा सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून दिले आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!