आपला जिल्हाक्राईम स्टोरी

१५ हजाराची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली होती ३० हजाराची लाच

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १८ जून 

अवैध रेती तस्करी करताना पकडलेले दोन ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजर रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एटापल्ली येथे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. धनीराम अंताराम पोरेटी (३३) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे.

एटापल्ली तालुक्यातील नदी, नाले हे  वनविभागाच्या कक्षेत येतात. या तालुक्यात एकही वैध रेती घाट नसल्याने रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूकीशिवाय दुसरा पर्याय नाही. अशावेळी वनविभागाचे अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय अन्य मार्ग नाही. त्यामुळे या प्रकरणात एकटा वनरक्षकच आरोपी आहे, की याचे धागेदोरे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

धनीराम पारेटी हा एटापल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहे. तक्रारदाराचे एटापल्लीत दोन ट्रॅक्टर आहेत. त्याद्वारे नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करताना १७ जून रोजी वनरक्षक धनीराम पोरेटी याने दोन्ही ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडले. कारवाई न करता सोडून देण्यासाठी दोन ट्रॅक्टरचे प्रत्येकी १५ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितली. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबतची शहानिशा करून सापळा कारवाई करीत अवैध रेती तस्कराच्याच सेतू केंद्रात धनीराम पोरेटीला १५ हजार रुपये नगदी घेतांना रंगेहात पकडले. आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेवर एटापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार नत्थु धोटे, अंमलदार राजेश पदमगीरवार, स्वप्नील बांबोळे, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण यांनी केली.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!