आपला जिल्हा

नुकसानीच्या पंचनाम्यांचे अंतिम अहवाल सादर ; नुकसानग्रस्तांसाठी ३० कोटींची मागणी

जीवितहानी झालेल्या कुटुंबांना मिळणार ४ लाख रुपये

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०६ ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुराने घातलेल्या थैमानात मोठ्या प्रमाणात शेती, घरे, गुरांसह जीवितहानी झाली आहे. अनेक अडचणींवर मात करीत अखेर प्रशासनाच्या यंत्रणेने नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. त्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ३० कोटी रुपयांच्या शासकीय मदतीच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. या आपत्तीत जीवितहानी झालेल्या १२ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे मदत वाटप करण्यात आली आहे. मात्र उर्वरित सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत आल्यानंतरच दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात बारमाही सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. तरीही जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे ३६ हजार ७९३ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यात एकूण २५ हजार ९७८ शेतजमिनीवरील पीक खराब झाले. यात सर्वाधिक नुकसान सिरोंचा तालुक्यात ६ हजार ९८८ हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ६४८६ हेक्टर, गडचिरोली तालुक्यात ४६३० हेक्टर, आरमोरी तालुक्यात २८५४ हेक्टर, धानोरा तालुक्यात ८८६ हेक्टर, मुलचेरा तालुक्यात २९६ हेक्टर, कुरखेडा तालुक्यात २४१ हेक्टर, भामरागड तालुक्यात १०९ हेक्टर, तसेच एटापल्ली तालुक्यात ५५ हेक्टर, देसाईगंज तालुक्यात २८ हेक्टर, तर कोरची तालुक्यात ११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात २७ हजार ८०३ शेतकऱ्यांच्या २० हजार ७३१ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक ११ हजार ८९८ हेक्टरवरील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्यात ६ हजार ४४३ हेक्टरवरील तर अहेरी तालुक्यात २ हजार ५०९ हेक्टरवरील कापूस पीक वाया गेले. याशिवाय चामोर्शी तालुक्यात २ हजार ६०९ हेक्टर, मुलचेरा तालुक्यात २३६ हेक्टर आणि गडचिरोली तालुक्यात ९८ हेक्टरवरील कापसाचे पीक वाया गेले आहे.

शासनाच्या निकषानुसार ४८ तासांपेक्षा जास्त वेळ घरात पाणी शिरलेले असेल तर त्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळते. जिल्ह्यात अशी २९४८ कुटुंबे आहेत. त्यांच्यासाठी १ कोटी ४८ लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक कुटुंबे सिरोंचा तालुक्यातील आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!