
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २४ ऑगस्ट
धानोरावरून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या हेटी येथील साईनाथ कुमरे यांच्या घरी मंगळवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास ३२ लाखांची रोकड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या रकमेशी नक्षल्यांचा संबंध असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मंगळवारी सकाळी धानोरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून साईनाथ कुमरे यांच्या घरी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आला. तपासात पोते व एका डब्यातून बेहीशाब ३२ लाख ६२ हजार २१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हेटीसारख्या लहानशा गावात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने पोलिसही चक्रावले. सायंकाळी बँकेत नेऊन पैशाची मोजणी करण्यात आली. धानोरा तालुक्यात नक्षल चळवळीची पाळेमुळे घट्ट रोवली आहे. येथून नक्षल्यांना आर्थिक रसद पुरविल्या जात असल्याचे आजपर्यंत अनेकदा उघडकीस आले आहे. या परिसरात नक्षली घटना घडून आल्या आहेत. त्यामुळे ही रक्कमही नक्षल चळवळीसाठी जमा करण्यात आली होती का? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
जप्त केलेली रक्कम पोताभर असून पोलिसांनी सांगितलेल्या रक्कमेपेक्षा कितीतरी पट्टीने जास्त रक्कम पोलिसांनी जप्त केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांचे सुचनेप्रमाणे धानोरा येथील पोलीस उप-निरीक्षक सचिन सानप, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, हवालदार नैताम पोना बोरकुटे तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० चे १७ कर्मचारी यांनी केली आहे. या प्रकरणाची आयकर विभागाकडूनही चौकशी होणार असून त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.