आपला जिल्हा
शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकारी भारावले
शाळा व्यवस्थापन समिती देलनवाडीच्या वतीने फुलोरा उपक्रमाचा गौरव

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ ऑगस्ट
अतिदुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणेतून फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या शैक्षणिक परिवर्तनाने आनंदी झालेल्या आरमोरी तालुक्यातील देलनवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा बुधवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून फुलोरा उपक्रम सुरू असून या उपक्रमामध्ये मुलांना हसत खेळत शिक्षण देण्यात येत आहे. कोरोना आपत्तीने विद्यार्थ्यांना कोणते प्रकारचे पोषक शैक्षणिक वातावरण मिळाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते. सदर नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने फुलोरासारखा उपयुक्त उपक्रम जिल्ह्यातील जवळपास १ हजार शाळांमध्ये सुरू आहे. या उपक्रमामध्ये मुलांची बोलीभाषा न नाकारता त्यांना प्रमाणभाषेकडे नेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या कृती केल्या जातात. सोबतच मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच बालशिक्षण दिल्या जाते. उपक्रम पंतप्रधान पुरस्कारासाठी प्रस्तावित असून केंद्रीय समितीच्या वतीने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. या नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा गौरव करण्यासाठी देलनवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुमार आशीर्वाद यांची भेट देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. सोबतच त्यांनी गावातील शिक्षण व्यवस्थेची माहिती घेऊन शाळेला प्रातिनिधिक भेट देण्याची ग्वाही दिली. यावेळी कबिरदास कुंभलवार, प्रदीप घरत, खेमराज गेडाम, सुनिल करंडे, मंगल साखरे, वाल्मिक नन्नावरे उपस्थित होते.