आपला जिल्हाक्राईम स्टोरी

सूरजागड लोहदगड वाहतुकीचा एकाच आठवड्यात दुसरा बळी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० मे 

सूरजागड खाणीतील लोहदगडाची वाहतुक करणाऱ्या ट्रकने शनिवारी पुन्हा एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. मुलचेरा तालुक्यातील गोमनी येथील वासुदेव कुळमेथे वय ४९ वर्ष. असे मृत शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडला. उल्लेखनीय आहे की सोमवारी आष्टी जवळ सूरजागड खाणीतील लोहदगडाची वाहतुक करणाऱ्या अनियंत्रित ट्रकने एका १२ वर्षीय बालिकेचा बळी घेतला. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत शिक्षक असलेले वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते शहरातूनदेखील भरधाव जात असतात. त्यामुळे या मार्गावर कायम अपघाताचा धोका असतो. काही दिवसांपूर्वी असेच एका अवजड वाहनाने आष्टी येथे १२ वर्षीय मुलीला चिरडले होते. आता निर्दोष शिक्षकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे सूरजागड लोहखनिज वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सूरजागडच्या अपघातग्रस्त वाहनांसाठी प्रशासन तत्पर

एरवी कोणतीही घटना घडल्यावर उशिराने जागे होणारे प्रशासन सूरजागडच्या वाहनांनी अपघात झाल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात घेतात. एवढेच नव्हे तर अवघ्या काही मिनिटांत परिस्थिती जैसे थे करून वाहतूक सुरळीत करतात. लोकं मेली तरी चालेल पण लोहखनिज वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. हा नियम ते काटेकोरपणे पाळताना दिसून येतात. अशी चर्चा अपघातस्थळी होती.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!