अहेरी तालुक्यातील महागाव (बु) येथे भूकंपाचे धक्के
तेलंगणातील शिरपूर, कागजनगर परिसरासह १० किमी सीमावर्ती भागात भुकंपाचे सौम्य धक्के. गोदावरी फौल्ट मध्ये भूकंप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ मार्च
मंगळवारी सकाळी ८:४२ च्या सुमारास तेलंगणा राज्यातील शिरपूर, कागजनगर परिसरासह १० किमी सीमावर्ती भागात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. गोदावरी फौल्ट मध्ये हा भूकंप झाला असून हे भूकंप प्रवण केंद्र आहे. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल असून जमीनीच्या आत ५ किमी खोल भूकंप झाला आहे. हा सौम्य धक्का असला तरी याचे धक्के चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी परिसरात व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) गावाला सुद्धा जाणवले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली कार्यालयात यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा देतानाच नाशिक केंद्राने अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नाही. असे म्हटले आहे. तर अर्थक्वेक पोर्टलने भूकंपाचे सौम्य धक्के शिरपूर, कागजनगर परिसरात जाणवल्याचे म्हटले आहे. महागाव ( बु.) गावातील काही नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून अहेरी येथील समाजमाध्यम कर्मींना ही माहिती दिली. हे अत्यंत सौम्य धक्के असल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.