आपला जिल्हाताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत १९ सामाजिक दायित्व उपक्रमांसाठी सामंजस्य करार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ जून 

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण १९ सामाजिक उपक्रमांबाबत सामंजस्य करार करण्यात आले.

अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मराव आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यावेळी उपस्थित होते.
या करारांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, सौरऊर्जा, जलसंधारण, पोषण, कृषी, ग्रामविकास आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये कार्यवाही होणार असून, हे उपक्रम स्थानिक जनतेसाठी थेट लाभदायक ठरणार आहेत. शासन व खासगी क्षेत्र यांच्यातील समन्वयातून गडचिरोलीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचा दावा सरकार कडून करण्यात आला आहे.

यामध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भाताच्या तणसापासून संकुचित बायोगॅस व इथेनॉल प्रकल्प, हुंडई मोटर्स द्वारे २०० शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा
क्लीनमॅक्स व फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स कडून १५,६०० स्वच्छ चुलींचे वाटप, एचडीएफसी लाइफ मार्फत गोंडेवाही येथे २०० एकरवर बांबू लागवड, एस्सिलॉर फाउंडेशन तर्फे शाळांमध्ये लायब्ररी व चष्मे वाटप, सेल्को इंडिया द्वारे १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जा प्रणाली हिंदुस्तान युनिलिव्हर कडून मामा तलाव येथे जलसंधारण प्रकल्प, नाबार्ड व बाईफ मार्फत ५० गोदामांचे बांधकाम, अ‍ॅक्सिस बँक व बाईफ मार्फत ५,००० आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न दुपटीने वाढवणे, एसबीआय व बाईफ द्वारे १८,००० कुटुंबांचे जीवनमान उंचावणे, वेदांता लिमिटेड कडून १०० अंगणवाड्यांचे नुतनीकरण, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडून ५ नवीन अंगणवाड्यांची उभारणी, टाटा ट्रस्ट चे वतीने स्थानिक शेतकऱ्यांमार्फत अन्न व पोषण उपक्रम, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत युवकांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण. प्राज इंडस्ट्रीज मोह फुलांपासून जैवइंधन निर्मिती करणार. झोमॅटो ५०० हेक्टर कृषिवनशैली (अ‍ॅग्रोफॉरेस्ट्री) प्रकल्प साकार करणार, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आदिवासी वसतिगृह बांधणी, एचडीएफसी बँक व डब्ल्यूओटीआर ‘परिवर्तन’ उपक्रमांतर्गत ग्रामविकास करणार आणि राष्ट्रीय विमा संस्था व बाईफ महिला सक्षमीकरण आणि पोषण कार्यक्रम करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!