विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने घेतला शालेय विद्यार्थीनीचा बळी
स्विटी बंडू सोमणकर ही विश्वशांती विद्यालय, कुनघाडा येथे इयत्ता नवव्या वर्गात शिकत होती.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१८ मार्च
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विजेच्या कडकडासह आलेल्या अवकाळी पावसाने एका शालेय विद्यार्थीनीचा बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्विटी बंडू सोमणकर असं विद्यार्थिनीचं नाव असून ती शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे आपल्या घरी परत जात होती. अचानक वीज कोसळल्याने ती गंभीररीत्या भाजली गेली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. ती चामोर्शी तालुक्यातील विश्वशांती विद्यालय, कुनघाडा येथे इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती.
मालेर चक येथून कुनघाडा या गावाचे अंतर दोन किलोमीटर आहे. स्विटी नेहमीप्रमाणे आपल्या गावातील विद्यार्थ्यांनीसोबत सायकलने निघाली. शनिवारी (१८ मार्च) सकाळची शाळा आटोपून ती साडे दहाच्या सुमारास सायकलने घरी येत होती. अगदी गावाजवळ येताच वीज कोसळली. यात स्विटीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिच्या मागे-पुढे आणखी काही शाळकरी मुली होत्या. मात्र त्या काही अंतरावर असल्यानं त्यांना इजा झाली नाही, अशी माहिती कुनघाडा केंद्रप्रमुख गोमासे यांनी माध्यमांना दिली.
राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातही याचा परिणाम बघायला मिळाला. मागील दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून शुक्रवारी आणि शनिवारी हलक्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. शनिवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या नागपूर विभागानं शुक्रवारी १७ मार्चला सायंकाळच्या सुमारास पुढील ४८ तासांत गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचं आवाहन भ्रमणध्वनी संदेशाद्वारे करण्यात आलं होतं.