आपला जिल्हाताज्या घडामोडी

‘मेक इन गडचिरोली’ च्या पिडीतांचे बेमुदत आमरण उपोषण

आमदार डॉ देवराव होळी यांनी अनेक बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ मार्च 

गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘मेक इन गडचिरोली’ योजनेच्या नावाखाली व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला यांच्यासोबत मिळून युवक व महिलांची कोट्यवधींनी फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने फसवणूक झालेल्या पिडीतांनी मंगळवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे आंदोलकांविरोधात आमदार होळींनी प्रत्येकी एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

२०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपचे आमदार झाल्या नंतर डॉ. देवराव होळी यांनी मेक इन इंडिया च्या धर्तीवर ‘मेक इन गडचिरोली’ ही संकल्पना गडचिरोली जिल्ह्यात सुरू केली. या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना मत्स्योत्पादन, कुक्कुटपलान, राईस मील, जेसीबी घेण्यासाठी कर्ज, अगरबत्ती प्रकल्प सारखे उद्योग उभे करण्यासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड आदी ४० ते १०० टक्के अनुदानावर मिळवून देऊन असे आमिष दाखविण्यात आले. यासाठी गरजू युवक व महिलांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. अनेकांनी खाजगी कर्ज उचलून उद्योग उभारण्यास सुरुवात देखील केली. मात्र, आमदारांनी सांगितल्याप्रमाणे अनुदान मिळालेच नाही. उलट या तरुणांच्या नावावर लाखोंची उचल करण्यात आली. अगरबत्ती उद्योग प्रकल्पातील प्रत्येक महिलांच्या नावे २ लाखांचे कर्ज उचलण्यात आले. सद्यस्थितीत बँकेचे कर्मचारी कर्ज वसूल करायला या युवक व महिलांच्या मागे तगादा लावत आहेत. जेव्हा की योजनेच्या नावाखाली या सर्वांकडून पैसे घेण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना अनुदान मिळाले नाही आणि ती योजनाही प्रत्यक्षात अंमलात आली नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलांनी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्याची योजनेचा व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला आणि आमदार डॉ. होळी यांच्याकडे मागणी केली. मात्र, पैसे देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. असे पिडीत उपोषण कर्त्यांनी म्हटले आहे. आमदारांनी मोठमोठी स्वप्न दाखवून अनेकांची फसगत केली. त्यामुळे आमचे संसार उघड्यावर पडले. फसवणूक करणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी व श्रीनिवास दोंतुला यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.परिणामी न्यायासाठी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आरोप बिनबुडाचे,राजकीय हेतूने प्रेरित
माझ्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून ते निराधार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळावी म्हणून आपण मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर ही योजना चालू करण्याचा प्रयत्न केला होता. यातून कोणाचीही फसवणूक केलेली नाही. असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर न्यायालयात प्रत्येकी एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
आमदार डॉ. देवराव होळी, गडचिरोली
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!