आपला जिल्हा

सुरजागडचे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत युवक ठार

अवजड आणि अनियंत्रित वाहतूकीचे बळी ठरताहेत गडचिरोलीचे निष्पाप नागरिक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १७ जाने.

सुरजागड येथील पहाडावरुन लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम गावाजवळ घडली. निकेश चोखारे (३०) रा. लक्ष्मणपूर,ता.चामोर्शी असे मृताचे नाव आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज उत्खनन करण्याचे काम लॉयड मेटल्स एन्ड एनर्जी व त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दोन कंपन्या संयुक्तपणे मागील दीड वर्षांपासून करीत आहेत. दररोज पहाडावरुन लोहखनिज नेणारे शेकडो ट्रक सुरजागड, एटापल्ली, अहेरी,आष्टी मार्गे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने धावत असतात. यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. उल्लेखनीय आहे की लोहखनिजाची वाहतूक रात्रीच्या दरम्यान अधिक होत असुन ट्रकचालक भरधाव वेगाने अनियंत्रित पुणे धावत असतात. त्यातून मागिल तीन वर्षांपासून ही अपघातांची मालिका सुरूच आहे.

तीन महिन्यांपूर्वी सुरजागड ट्रकच्या अपघातात लगाम गावाजवळ एक महिला ठार झाली होती. त्यावेळी नागरिकांनी १० ट्रक पेटवून दिले होते. वारंवार घडणारे अपघात आणि खराब रस्ते यामुळे नागरिक संतापलेले असतानाच काल एका ट्रकने निकेश चोखारेचा बळी घेतला. निकेश हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमध्येच चालक म्हणून कार्यरत होता. पत्नी गरोदर असल्याने तो रजा घेऊन गावी गेला होता. रजा संपल्याने तो काल कंपनीच्या मद्दीगुडम येथील कार्यालयात गेला. तेथे हजेरी लावून परतताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. यात तो घटनास्थळीच मरण पावला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी निकेशच्या पार्थिवावर लक्ष्मणपूर या त्याच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!