शांतीग्राम ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार! सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेंद्र बिस्वास यांचा आरोप
माहिती अधिकारातही माहिती दिली जात नसल्याची व्यक्त केली खंत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ मे
जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम ग्रामपंचायतीत मागिल दहा वर्षांहून अधिक काळापासून स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संघटनेचे सदस्य ज्ञानेंद्र बिस्वास यांनी केला आहे.
शांतीग्राम ग्रामपंचायतीत केल्या जाणारे प्रत्येक काम हे निम्न दर्जाचे, भ्रष्टाचाराने माखलेले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. उल्लेखनीय आहे की शांतीग्राम ग्रामपंचायती अंतर्गत कांचनपूर,गिताली आणि शांतीग्राम अशी तीन गावे येतात. २०१७ मध्ये गिताली गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सिमेंट कांक्रीट रस्ता आमदार निधीतून बांधण्यात आला. या बांधकामाचे देयक काम पूर्ण होतात दिले गेले. मात्र २०२२ ला पून्हा याच कामाचे १० लक्ष रुपये साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदाराला दिले गेले. म्हणजेच एकाच कामासाठी दोनवेळा पैसे दिले गेले. माहिती अधिकारात सदर माहिती मागितली असता ती दिली जात नाही. गावातील अनेक जमीनींवर अवैध अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण सत्ताधारी पक्षाचे नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आहेत. ते काढण्याची कोणतीही कारवाई केली जात नाही.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातही मोठी अनियमितता असून नियमानुसार काम पूर्ण झालेले नाहीत. एवढेच नव्हे तर कामावर नसलेल्यांना उपस्थित दाखवून मजूरांच्या खात्यावर पैसे जमा करून नंतर ते परत घेतले जात आहेत. रोजगार सेवकाने अनेक मजूरांचे एटीएम कार्ड तयार करून ते स्वतः कडे ठेवून व्यवहार केले जात असल्याचा आरोप बिस्वास यांनी केला आहे. या संदर्भात मुलचेरा पंचायत समिती कडे वारंवार तक्रारी करुनही त्यांचेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे कडे तक्रार दाखल केली आहे. यावरही कारवाई झाली नाही तर न्यायालयाचे दार ठोठावले जाईल असा इशारा बिस्वास यांनी दिला आहे.