स्कूल बसच्या अपघातात विद्यार्थी जखमी
सिरोंचा तालुक्यातील आसरअली अंकिसा मार्गावरील दुर्घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० डिसेंबर
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथून आसरअलीकडे निघालेल्या स्कुल बसचा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. ही बस अंकीसा येथून जवळपास ६० ते ६५ विद्यार्थ्यांना कोंबून आसरअली कडे जात होती. या बस मधील अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ए पी-१५ एक्स ९६१७ क्रमांकाची स्कुल बस अंकीसा येथील लक्ष्मीकांतय्या इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथून शाळा सुटल्यावर जवळपास ६० ते ६५ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आसरलीकडे जात होती. दरम्यान बस अचानक रस्त्याच्या कडेला ऊतरली आणि पलटली यात अनेक विध्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आसरअली येथील पालकांनी दिली आहे.
स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती कळताच आसरअली येथील पालकांनी लगेच धाव घेत आपापल्या पाल्यांना जवळपास असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.सदर अंकीसा ते आसरअली हा राष्ट्रीय महामार्ग असून हा रस्ता थेट छत्तीसगडकडे जातो. स्कूल बस म्हणून वापरत असलेले वाहन हे आंध्र प्रदेशची पासिंग असलेली आहे. ही बस अक्षरशः भंगार स्थितीत असून सदर वाहनचालक नशा करून वाहन चालवत असल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे.
या अपघातात नेमके किती विद्यार्थी जखमी झाले याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी पालकांनी आपापल्या पाल्यांना उपचारार्थ दाखल केले आहे. विशेष म्हणजे खाजगी शाळेत चालविली जाणारी बस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमका अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पालकांकडून शालेय प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केली जात आहे. सदर अपघाताची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.