पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला २० वर्षाचा सश्रम कारावास
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ; ५० हजार रु. द्रव्यदंडाची शिक्षा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २४ ऑगस्ट
घरा बाहेर खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रु. द्रव्यदंडाची शिक्षा गडचिरोली येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी बुधवारी सुनावली आहे. चतुर उर्फ चेतन मारोती मेश्राम (२३) रा. वाकडी ता. चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, १४ जुलै २०१९ रोजी पिडीत आपल्या घरुन बाहेर खेळायला गेली असता एकटी असल्याचा फायदा घेवुन आरोपी चेतन मेश्राम याने पिडीतेला त्याचे घरी नेवून तिच्यावर अत्याचार केला. पिडीतेची आई सांयकाळी शेतातून घरी आल्यानंतर पिडीतेने आईला आरोपीच्या कृत्यबद्दल सांगितले. त्यानंतर पिडीतेच्या आईने सदर घटनेबाबत आरोपीच्या आईला सांगितले. परंतू आरोपी गुन्हा कबुल करत नव्हता. त्यानंतर पिडीतेचे वडील व आईने १५ जुलै २०१९ रोजी आरोपी विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बालकाचे लैंगिक अत्याचार कायदयान्वये गुन्हा नोंद करून आरोपीला १५ जुलै रोजी अटक केली.
पोलिसांनी तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आरोपीस कलम ३७६ (अब) व कलम ४.६ बालकाचे लैंगिक अत्याचार कायदयान्वये दोषी ठरवुन २० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर दंडाची रक्कम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणुन देण्याचा आदेश न्यायमूर्ती यु. एम. मुधोळकर यांनी पारीत केला आहे.