धानोरा आविम च्या उपप्रादेशिक व्यवस्थापकासह दोन अधिकारी निलंबित
मुरूमगाव येथील धान खरेदी केंद्रावरील घोटाळा प्रकरण
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २४ ऑगस्ट
धानोरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मुरूमगाव येथील खरेदी केंद्रावरील ९८७८.९५ क्विंटल म्हणजे ३ कोटी ५६ हजार २९८ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे धानारो येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज सुंदरलाल चौधरी तसेच प्रतवारीकर तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल नानाजी कोकोडे यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत विविध ठिकाणच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून खरीप आणि रब्बी धान खरेदी केली जाते. अशीच सहकारी संस्था मुरूमगाव येथेही आहे. या संस्थेमार्फत २०२१-२२ मध्ये सभासद शेतकऱ्यांकडून खरीप व रब्बी हंगामातील ३३ हजार ६६९.५० क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. त्यापैकी २३ हजार ७९० क्विंटल धानाची उचल करण्यात आली. उर्वरित ९ हजार ८७८ क्विंटल धान गोदामात शिल्लक असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. दरम्यान प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली यांनी प्रत्यक्षात भेट दिली असता धान गोदामात उपलब्धच नसल्याने दिसून आले.
या धानाची हमी भावाप्रमाणे किंमत १ कोटी ९१ लाख ६५ हजार १६३ रुपये एवढी आहे. शिवाय नियमाप्रमाणे संस्थेकडून दीड पटीने वसुलपात्र असलेली रक्कम २ कोटी ८७ लाख ४७ हजार ७४४ रुपये आणि बारदाण्याची रक्कम १५ लाख ८ हजार ५५३ रुपये अशी एकूण ३ कोटी २ लाख ५६ हजार २९८ रुपयांचा अपहार करुन शासनाची दिशाभूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांनी धानोरा येथील आविमचे उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी आणि प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
चौधरी यांच्याकडील उपप्रादेशिक व्यवस्थापक धानोरा या पदाचा अतिरिक्त पदभार आरमोरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे हिंमतराव सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.