गडचिरोली पोलिसांकडून ६५० दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ
पोलीस दादालोरा खिडकीच्या वतीने दिव्यांग महामेळावा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ ऑगस्ट
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ६५० दिव्यांगांची तपासणी करून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. तसेच आवश्यक असलेल्या दिव्यांगांना व्हिलचेअर वाटप करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दल, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय व महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ, विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व स्तरातील दिव्यांगासाठी रविवारी दिव्यांग महामेळावा गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ६५० दिव्यांगाची तपासणी करून त्यांना दिव्यांग साहीत्य, दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप करण्यात आले.
यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, तसेच डॉ. इंद्रजित नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, सहायक लेखा अधिकारी पी.डी. पारसे, मंगेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, जिल्हा सामान्य रुग्णालय, समाज कल्याण कार्यालय गडचिरोली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोलीच्या टीमने अथक परिश्रम घेतले.
आतापर्यंत २ हजाराहून अधिक दिव्यांगांना लाभ
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन दिव्यांगासाठी आरोग्य शिबीर राबवुन यात ९९२ दिव्यांगाना प्रमाणपत्र, ६३० दिव्यांगाना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, ८५० दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना, ४१० दिव्यांग नागरिकांना साहीत्य वाटप, ४११ दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय इत्यादी साहीत्य वाटप करण्यात आलेले आहेत.