गडचिरोली पोलिसांच्या दादालोरा खिडकीला ‘आयएसीपी’/ वॉलमार्ट चा लीडरशिप इन कम्यूनिटी पोलिसिंग पुस्कार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ ऑगस्ट
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील लोकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आयएसीपी’/ वॉलमार्ट अर्थात इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलिस चा लीडरशिप इन कम्यूनिटी पोलिसिंग हा पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागास घटकांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना दिला जातो. या पुरस्कारामध्ये बेस्ट इन लार्ज एजन्सी या विभागातुन गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे १८ ऑक्टो २०२२ ला होऊ घातलेल्या वार्षिक संमेलनात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारानंतर आयएसीपी ची एक वर्षाची सदस्यता मिळणार आहे.
जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पीत, नक्षलपिडीत तसेच आदिवासी जनतेला विविध शासकीय योजना, शासकीय दाखले, उच्च दर्जाचे कृषी बियाणे, रोजगार व स्वयंरोजगार अशा अनेक योजना एका खिडकीच्या माध्यमातून राबविता यावे या उद्देद्शाने पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेंतर्गत पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्र असे एकूण ५३ ठिकाणी पोलीस दादालोरा खिडकीची सुरुवात करण्यात आली. दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत २ लाख १४ हजार ५३८ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. यात ९०२६ नागरिकांना प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र, ५५३२० प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना, १ लाख २० हजार ७०५ विविध प्रकारचे दाखले, १६९ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, ५६४१ युवक-युवतींना व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना, प्रोजेक्ट कृषी समृध्दी ११६३३, प्रोजेक्ट शक्ती १५४६ व १०३२५ नागरिकांना इतर उपक्रम लाभ मिळवून त्यांनाविकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.
गडचिरोली जिल्ह्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलीस दलास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उप पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रातील सर्व अधिकारी, अंमलदारांनी या आव्हानांना स्वीकारून जिल्ह्यातील गरजु आदिवासी बांधवांपर्यंत जावुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन विविध शासकिय योजनांचे लाभ मिळवुन देण्यासाठी परिश्रम घेवुन उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे.
अंकित गोयल
जिल्हा पोलीस अधीक्षक