जिल्हाभर जागतिक मुलनिवासी दिवस उत्साहात साजरा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०९ ऑगस्ट
जागतिक आदिवासी दिनानिमित्य गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींनी जिल्हाभर पावसाचा कहर असतांना आदिवासी अस्मिता जोपासता आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आपली मुल निवासी संस्कृती, परंपरा आणि आपली धार्मिक, सामाजिक आस्था टिकवून ठेवण्यासाठी भर पावसात रेला नृत्य सादर करून जिल्हाभर उत्साहाने साजरा करण्यात आला.कुरखेड्यात जोरदार पाऊस सुरु असताना आदिवासी बांधवांनी भर पावसात छत्री पकडून रॅली काढली तसेच पारंपारिक रेला नृत्य करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

जागतिक मूलनिवासी (आदिवासी) दिनानिमित्त जिल्हाभरात ठिकाणी आदिवासी संघटनांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले. संयुक्त राष्ट्राने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मूलनिवासी अधिकार दिन म्हणून घोषित केला असल्यामुळे या दिवशी जगभरात आदिवासी बांधव आपल्या महापुरुषांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेत असतात. गडचिरोली शहरासह जिल्हाभर रॅली तसेच रेला नृत्य सादर करून मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
कोरची तालुक्यातील कुकडेल येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. व गाव पुजारी शंकर तुलावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मन्साराम नुरूटी, दवडी चे सरपंच बासमोती हलामी, पोलीस पाटील भारत नुरुटी, उपसरपंच रमेश तुलावी, रमेश कोरचा आदी उपस्थित होते.
गडचिरोली येथील संस्कृती लॉन येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी उपस्थित होते. भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे स्वच्छता अभियान व प्रभातफेरी काढून आदिवसी दिन साजरा करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या आदिवासी दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ताडगाव चे तलाठी आतला, भामरागड न.पं.चे उपाध्यक्ष विष्णू मडावी यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. गडचिरोली जवळील पोटेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी दिनानिमित्य अहेरी, एटापल्ली, धानोरा तसेच सर्व तालुक्यात विविध आदिवासी संघटनांच्या वतीने तसेच जिल्हाभरातील आश्रमशाळेत आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.