पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०७ ऑगस्ट
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे तालुक्यातील पूरग्रस्त सोमनपल्ली व कोतूरवासियांचे शासकीय भूखंडावर पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून सिरोंचाच्या तहसीलदारांकडे केली आहे.
सोमनपल्ली ग्रामपंचायत २ ऑगस्ट रोजी सोमनपली येथे सरपंच पुष्पलता आसम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले. उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सोमनपल्ली येथील पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन दरवर्षी मेडीगड्डा प्रकल्पामुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. सोमनपल्ली टोला व कोतूर येथील लोकांना ९ ते १४ जुलैदरम्यान आलेल्या पुराचा सामना करावा लागला. बहुतांश लोकांची घरे पुराचा फटका बसून कोसळले आहेत.
लोकांना पुराचा धसका घेत जीव मुठीत धरून राष्ट्रीय महामार्गाचा आसरा घ्यावा लागला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अस्थायी टेंट टाकून जीवन जगावे लागते. त्यामुळे शासनाच्या वतीने सोमनपल्ली टोला व कोतूर रे येथील पूरपीडित कुटुंबांचे शासकीय जागेवर पुनर्वसन करावे तसेच पुरामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी, अशा आशयाचा ठराव प्रतीसह निवेदन तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांना देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी हे उपस्थित होते.