लाचखोर आरोग्य सेवकास पोलीस कोठडी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०३ ऑगस्ट
पत्नीच्या नावाने कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी तिच्या पतीकडून साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी चामोर्शी पंचायत समितीच्या आरोग्य सेवकास रंगेहाथ पकडून अटक केली. रामचंद्र मार्कंडी पाटेवार (४७) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून गुरुवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याला त्याच्या पत्नीच्या नावाने कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून घ्यायचे होते. परंतु त्यासाठी पंचायत समितीचा आरोग्य सेवक रामचंद्र पाटेवार याने ४ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ३ हजार ५०० रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने संबंधित इसमाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचून रामचंद्र पाटेवार यास पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, शिपाई किशोर जींजाळकर, श्रीनिवास संगोजी, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, तुळशीराम नवघरे आदींनी केली.