दुर्गम भागात आजही मृतदेहाला सुद्धा भोगाव्या लागताहेत यातना; रुग्णवाहिके अभावी दुचाकीला बनवावी लागली शववाहिका
क्षयरोगामुळे २३ वर्षीय युवकाचा मृत्यू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागात आरोग्य सेवेचा असा बोजवारा उडाला आहे की मृत्यूनंतरही त्याच्या यातना संपत नाहीत. देशभर सर्वत्र यातना,वेदनांचे सत्र सुरू आहे यात गडचिरोलीत आणखी एका वेदनेची भर पडली आहे. भामरागड तालुक्यातील दुर्गम कृष्णार येथील एका २३ वर्षीय युवकाचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. मात्र त्याचा मृतदेह गावाकडे नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका अथवा शववाहिका उपलब्ध नसल्याने पार्थिव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्याची पाळी कुटूंबियांवर आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी यास १७ जुलै रोजी गंभीर अवस्थेत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या इस्पितळात भरती करण्यात आले होते. २० जुलैला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने शव दुचाकीवर खाटेला बांधून गावी नेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देशात क्षयरोग निर्मुलनासाठी विशेष मोहीम चालविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष विभाग कार्यरत असतो. निदान झाल्यानंतर रुग्णाला नियमित औषधोपचार देणे. वेळोवळी आरोग्यसेवकांच्या माध्यमातून त्याची देखरेख करणे. यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कृष्णार येथील २३ वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुण गणेश तेलामी याला जीव गमवावा लागला. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गणेशचे पार्थिव दुचाकीवरून नेण्यात आले.