गोवंश तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या ताब्यात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० जुलै
गोवंश तस्करी करून कत्तलीसाठी तेलंगाना राज्यात घेऊन जाणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात अहेरी पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
नागेपल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर एफडीसीएम कॉलनीत ए पी-२४-व्ही-०४२६ क्रमांकाचा ट्रक चिखलात अडकला होता. भल्या वेगाने जाणाऱ्या सदर ट्रकमध्ये काहीतरी असल्याचा संशय आल्याने टायगर ग्रुपच्या सदस्यांनी ट्रकवर झाकलेली प्लास्टिक खुले करून बघितले असता त्यात जनावरांना कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळले. सदर ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत ही माहिती अहेरी पोलिसांना दिली. ट्रक चिखलात अडकल्याने ट्रकचालक बाहेर पडण्याचा प्रयत्न करूनही त्याला जमलं नाही. अखेर अहेरी पोलिसांनी नागेपल्ली गाठून बघितले असता त्यात ट्रक भरून गोवंश तस्करी केले जात असल्याचे निष्पन्न झाले. गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना व सदर ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर जनावरांना गो-शाळेत पाठविण्यात आले आहे.
छत्तीसगड राज्यातून गडचिरोली मार्गे चंद्रपूर वरून तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी सुरू होती. मात्र, पोलिसांनी योग्य नियोजन करून या मार्गावर अनेक कारवाया करत ही तस्करी बंद केल्याने आता तस्करांनी आपला मोर्चा छत्तीसगड राज्यातून आलापल्ली-सिरोंचा मार्गे हैदराबाद असा वळविल्याचे दिसत आहे. मात्र, या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खड्ड्याने तस्करांचा घात झाला.