निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची न्यासाची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व वने सचिवांना निवेदन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा व गडचिरोली वनविभागात मागील वर्षभरात वाघाने २३ जणांना ठार केले आहे. तर अनेकांना जखमी केले. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात धान रोवणी सुरु आहे. मात्र, वाघाचे हल्ले वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या वाघांना जेरबंद करा यांसह विविध मागण्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीने निवेदनातून केल्या आहेत. वाघाचा बंदोबस्त न केल्यास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला. सदर निवेदन जिल्हाधिकारी संजय मीना यांचे मार्फत मुख्यमंत्री व वने सचिवांना पाठविण्यात आला आहे.
मागील काही दिवसात वाघाचे हल्ले वाढले असून २६ व २८ जुलै रोजी वाघाने हल्ला करून दोघांना ठार केले. वर्षभरात वाघांने २३ जणांचा जीव घेतला असून यापूर्वी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी घेऊन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व नागरिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र, वनविभागाला वाघाला पकडण्यात यश आले नाही. वनाधिकाऱ्यांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी लाखो रुपयाचा निधी घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी त्या निधीचा वापर केला. वनविभागाच्या वतीने पोर्ला वनपरिक्षेत्रात व्यापक जनजागृती झाली नसल्यामुळे या क्षेत्रात वाघाने सर्वात जास्त लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी तसेच निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या वाघांना जेरबंद करावे व नरभक्षक वाघाच्या हल्यात ठार झालेल्या कुटुंबियांना ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, जिल्हा सचिव फुलचंद वाघाड, तालुकाध्यक्ष रवींद्र शेलोटे, शहर प्रमुख भास्कर नरुले यानी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, सचिव वने यांना लेखी निवेदनातून केली आहे.
येत्या आठ दिवसात वाघाला जेरबंद करण्यात न आल्यास लोकशाहीच्या मार्गाने भ्रष्टाचार विरोधी जनआंदोल न्यास व परिसरातील जनतेच्या वतीने मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.