आपला जिल्हा

अतिवृष्टीमुळे बाधित ‍शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपये मदत करावी – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची गडचिरोलीतून दौर्‍याला सुरुवात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ जुलै

एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी केल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार धर्मराव आत्राम, मनोहर चंद्रिकापूरे, माजी खासदार राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की पाऊस ओसरुन दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही पंचनामे झाले नाही. सरकारने ते तातडीने करावे. साधारणतः या भागात दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे त्यामध्ये गडचिरोलीमध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्यामुळे साधारण ज्यांचं पीक उध्वस्त झालं त्यांना हेक्टरी पाऊणलाख मदत सरकारने तातडीने दिली पाहिजे

जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले तरी सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. ज्या गावांना भेटी दिल्या त्या शेतकऱ्यांनी पंचनामे झाले नाहीत. पंचनामे केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली.

शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची गरज आहे. तातडीने अधिवेशन घेण्याचीही गरज आहे. पावसाळी अधिवेशन व्हायला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे खासदार, आमदार या सर्वांना एकत्र घेऊन काम केलं तर त्याचे रिझल्ट हे गतीने मिळायला सुरुवात होते. परंतु तसं दुर्दैवाने आज पहायला मिळत नाही.

मंत्रिमंडळ विस्तारास अडवलं कुणी?

अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही यांनी शिंदे, फडणवीसांना धारेवर धरले. महिना होऊनही विस्तार न होणे हे चांगले नाही. १६५ आमदारांचा पाठिंबा आहे असे म्हणता, मग मंत्रिमंडळ विस्तारास तुम्हाला कुणी अडवलं? असा प्रश्न पवार यांनी केला. विस्तार झाला तर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या व्यथा सरकारपर्यंत तत्काळ पोहचल्या असत्या. शिवाय त्यांना मदतही मिळाली असती. मुंबईत बसणे आणि मंत्री नेमून काम करवून घेणे यात फरक आहे, असे पवार म्हणाले.

 

उणेदुणे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या

शिंदे गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत या संजय राऊतांच्या वक्तव्यावरील प्रश्नाच्या उत्तरात, कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यापेक्षा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना टोला लगावला. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अजित पवार यांनी शरसंधान साधले. पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता अजित पवारांनी एवढा उशिरा का लावला, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, आम्ही देखावा करीत नाही. प्रत्यक्ष मदत करतो. बावनकुळेंनी मीडियापुढे बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा उलट टोला पवार यांनी लगावला.

शेतकरी हे सरकारसाठी असेट्स

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा सरकार आणि राजकीय पक्षांसाठी असेटच (संपत्ती)आहे. सगळ्यांच पोट भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा शेतकरी कधीही लायबिलीटी (ओझे) होऊ शकत नाही. आणि सरकार म्हणून आम्ही त्या दृष्टीने वेळोवेळी मदत करीत असतो असे अजित पवार यांनी,’ शेतकरी असेट की लायबिलीटी?’ या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!