आपला जिल्हाविशेष वृतान्त

दोन दिवसात वाघाने घेतला दुसरा बळी

वाघ पुन्हा सक्रीय, जेरबंद करण्याची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ जुलै

बैल चारण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील धुंडेशिवणी जंगल परिसरात घडली. खुशाल तुकाराम निकुरे (६२) रा. धुंडेशिवणी असे मृतक इसमाचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी याच परिसरातील दिभना येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे वाघ पुन्हा सक्रीय झाला असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

सदर इसम गुरुवारी नेहमी प्रमाणे आपले बैल चारण्यासाठी धुंडेशिवणी गावाजवळील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दोन दिवसापूर्वी जंगलात रानभाज्या आणण्यासाठी गेलेल्या दिभना येथील नीलकंठ मोहुर्ले (५२) या शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने या परिसरात वाघाचे वावर असल्याने जंगलात जाऊ नये असे सूचना देण्यात आले होते. मात्र, वनविभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून खुशाल यांनी जंगलात आपले बैल चारण्यासाठी नेले व त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

गेल्या वर्षभरात गडचिरोली आणि वडसा वन विभागात तब्बल २३ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. आरमोरी, गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा, महादवाडी, चुरचुरा, दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, सध्या शेतीची काम असल्यामुळे जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना  शेतावर जाणे भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. सातत्याने वन विभागात वाघाच्या हल्ल्यात वाढ होत असल्याने नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!