पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जुलै
शेतालगत असलेल्या जंगलात अळंबी (मशरूम) काढत असताना एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गडचिरोली शहरापासून ८ की.मी अंतरावरील दिभना येथे मंगळवारी घडली. नीलकंठ गोविंदा मोहुर्ले (५२)रा. दिभना असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास नीलकंठ मोहर्ले हे आपल्या शेतावर गेले होते. जोरदार पाऊस पडत असल्याने जंगलात अळंबी उगवली आहे. नीलकंठ यांच्या शेतालगत जंगल असून ते शेताच्या बाजूला अळिंबी (मशरूम) काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात नीलकंठ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी वन विकास महामंडळाचे कर्मचारी आणि गडचिरोली पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करत आहेत.
वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू
गेल्या वर्षभरात गडचिरोली आणि वडसा वन विभागात तब्बल २२ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. तर दिभना गावातील हा वर्षभरातील चौथा बळी आहे. आरमोरी, गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा, महादवाडी, चुरचुरा, दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, सध्या शेतीची काम असल्यामुळे जंगलालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेतावर जाणे भाग असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.