गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै
राज्याच्या सहकार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बॅंकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सन २०२१-२२ या वर्षात वित्तीय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नाबार्ड च्या वतीने गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या श्रेणी मधून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक जी.एस. रावत यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार यांनी पुरस्कार स्विकारला. पुरस्कार वितरण सोहळयाला राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, बॅक ऑफ इंडियाचे रिजनल डायरेक्टर अजय मिचारी, बॅंक आफॅ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए.बी. विजयकुमार, अतुल जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
बॅंकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, सचिव अनंत साळवे व बॅंकेच्या संचालकांनी बॅंकेला प्राप्त झालेल्या पुरस्काराचे श्रेय ,खातेधारकांना दिले आहे. जिल्हा बॅंकने २०२१-२२ या आर्थिक वर्षात नाबार्डच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात २०० वित्तीय समावेशन कार्यक्रमाचे आयोजन केले. शुन्य बॅलेंसवर खाते उघडणे, शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड वितरण करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे ४५ हजार खातेधारकांनी बॅंकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढला असून सदर विमा योजना बॅंकेच्या वतीने प्रभाविपणे राबवून योजनेचा लाभ देण्यात येत आहे.