आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर चारचाकी वाहनात आढळला मृतदेह

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३सी वर असलेल्या निमलगुडम गावालगत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या पिकअप वाहनात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी राजाराम खांदला येथील पोलिसांना माहिती दिली असून सदर मृतदेह उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी येथे शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात राजाराम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पुढील तपास करीत आहेत.
अहेरी तालुक्यातील निमलगुडम ते गोलाकर्जी दरम्यान रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एमएच-३३-जी-१३४९ क्रमांकाच्या पीकअप वाहनातून दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी वाहनात बघितले असता चक्क मृतदेह आढळून आले. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. चारचाकी वाहनावर असलेल्या भ्रमणध्वनी नंबर वर पोलिसांनी संपर्क केले असता वाहन चालक आणि मालकाची माहिती मिळाली आहे. सध्यातरी मृत्यूचे कारण कळले नसलेतरी शवविच्छेदन साठी पोलिसांनी मृतदेह अहेरी येथे पाठविले आहे.
वाहन मालक रवीकिरण भेंडारे यांच्याशी संपर्क केले असता, वाहन चालकाचे नाव प्रमोद दुधबळे असून तो नवेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली. शनिवारी आश्रम शाळेचे राशन घेऊन कमलापूर येथे गेल्याची माहिती त्यांनी दिली. रेशन उतरवून परत येताना नेमकं काय झालं याची माहिती कोणालाच नाही. सदर वाहनातून दुर्गंध येत असल्याने कदाचित शनिवारीच वाहन चालकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.