वन तस्करांशी वन अधिकाऱ्यांचे संगनमत; कोट्यवधींच्या सागवानाची अवैध तोड
चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याची शंकर ढोलगे यांची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ११ जून
जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र पेंडीगुडम स्थित मुलचेरा उपक्षेत्र गोमणी, मुखडी टोला खंड क्र. १३२ मधील मौल्यवान सागवान झाडांची अवैध वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना मदत करणाऱ्या स्थानिक वनरक्षक, क्षेत्रसहाय्यक, वन परिक्षेत्र अधिकारी यांची विभागीय चौकशी करुन निलंबनाची कारवाई करावी अन्यथा आगामी काळात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी वन प्रशासनाला दिला आहे.
त्यांनी याबाबत मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनवृत्त गडचिरोली आणि उपवन संरक्षक वनविभाग, आलापल्ली यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र पेंडीगुडम स्थित मुलचेरा उपक्षेत्र गोमणी, मुखडी टोला खंड क्र. १३२ या नियत क्षेत्रामध्ये कित्येक वर्षापासून सागाचे झाडांचे अवैध वृक्षतोड होत आहे. त्या क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी, क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक यांनी सागवान झाडांचे अवैध वृक्षतोड करणाऱ्या वन तस्करांशी संगनमत करुन स्वतःच्या लाभापोटी कित्येक मौल्यवान सागवान झाडांची तोड केलेली आहे.
यासंदर्भात गावकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांचे म्हणणे होते की, कित्येक वर्षांपासून या मौल्यवान सागवानाची तोड संगनमताने करीत आहेत. प्रत्यक्षात या वनक्षेत्रात अनेक वर्षापासून सागाच्या झाडांची अवैध वृक्षतोड झालेली दिसून येत असताना क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक यांनी वृक्षतोडीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती सुध्दा दिलेली नाही. तसेच प्राथमिक पंचनामे करुन वन गुन्हे सुध्दा दाखल केलेले नाहीत. मात्र त्या भागातील नागरिकांना कारवाई केल्याचे भासवण्यासाठी काही तोडलेल्या झाडांच्या खोडांवर लाल रंगाने क्रमांक आणि तारीख लिहून ठेवत नागरिकांची आणि वरिष्ठ वन प्रशासनाचीही फसवणूक केलेली आढळून येते. असा आरोप शंकर ढोलगे यांनी केला आहे. अशाप्रकारे वन तस्करांशी संगनमत करून कोट्यवधींचे सागवान लुटून नेणाऱ्या क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांची विभागीय चौकशी करुन दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.