डॉक्टर गैरहजर असल्यामुळे दोन वर्षीय बालकाचा मृत्यू
गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयातील घटना
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १३ जुलै
रुग्णालयात डॉक्टर गैरहजर असल्यामुळे वेळेत उपचार न झाल्याने एका दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुधवारी गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात घडली. पार्थ प्रधाने असे त्या बालकाचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील चंद्रकांत प्रधाने यांचा दोन वर्षीय मुलगा पार्थला ताप आला होता. कुटुंबियांनी पार्थ ला सावली येथील रुग्णालयात भरती केले असता, बालकाला ताबडतोब गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात दाखल करा असे सावलीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कुटुंबीयांनी बुधवारी पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील बाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी डॉक्टर उपस्थित नव्हते. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यरत असणाऱ्या डॉ. तारकेश्वर उईके यांना फोन केला त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. रुग्णालयात दाखल केल्याच्या तीन तास उशिरा डॉ. उईके रुग्णालयात आले. तो पर्यंत त्या बाळाचा मृत्यू झाला होता.
रात्रीच्या वेळेस कार्यरत डॉ. उईके गैरहजर असल्याने पार्थ ला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे दोषी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके यांचेवर सदोष मनुष्यवधाच्या कलम अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मृत बालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच खासदार अशोक नेते यांनी रुग्णालय गाठले व डॉ. उईके यांचेवर कठोर कारवाई करावी अशी सूचना सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांना दिले.