समाजसेवक गणेश कोवे यांना पितृशोक
एटापल्ली येथील डुम्मे नाला मोक्षधामावर त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ६ फेब्रुवारी
एटापल्ली येथील प्रतिष्ठित नागरीक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा गायत्री परिवाराचे प्रमुख ज्ञानेश्वर सखारामजी कोवे यांचे दिनांक ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८०वर्षे होते.
जि. प. गडचिरोलीच्या प्राथमिक शिक्षक संवर्गातील ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. अतिशय सचोटीपुर्ण तथा प्रामाणिकपणे त्यांनी आपली सेवा बजावली होती. सेवाकाळात त्यांनी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे एटापल्ली तालुका सचिव म्हणून प्रदिर्घ काळ काम पाहीले. या काळात तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांना घेऊन त्यांनी अनेकवेळा शिक्षकांचे यशस्वी आंदोलन केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही. पुढे एटापल्ली तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि मृत्युपर्यंत ते या पदावर होते. आयुष्याच्या अखेरच्या दिवशी सुद्धा ते सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्या घेऊन पंचायत समितीत शिष्टमंडळ घेऊन गेले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
- शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांचा अनेक सामाजिक तथा धार्मिक कार्यात सहभाग होता. ते गायत्री परिवार एटापल्लीची धुरा सांभाळत होते. त्यांच्या सक्षम नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात गायत्री परिवाराचा फार मोठा विस्तार झाला आहे. ८० वर्षाचे सचोटीपुर्ण सेवाभावी दिर्घ आयुष्य जगून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एटापल्ली येथील डुम्मे नाला मोक्षधामावर त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आले.