अजून किती लोकांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार? गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा सवाल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१५ मे
सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक वाढलेली असून जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सुरजगड खाणीत चालणाऱ्या अनेक ट्रकचे चालक वाहतुकीचे नियम बाजूला ठेवून सुसाट वेगाने गाड्या चालवतात त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सरकार आणि स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलताना दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचेवर कंपनीचा काही दबाव आहे की काय? अजून किती लोकांचे बळी गेल्यावर सरकारला जाग येणार असा सवाल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.
रविवारी आष्टी जवळ सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अनियंत्रित ट्रकने बारा वर्षीय मुलीचा बळी घेतल्यानंतर या परिसरात तीव्र असंतोष व्याप्त आहे. त्या पार्श्वभूमीवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी हा सवाल सरकारला विचारला आहे.
गडचिरोली हे पालकमंत्र्यांसाठी टूरिझमचे ठिकाण!
जिल्ह्यात एवढ्या मोठया समस्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवसाच्या सहलीला आल्यासारखे वर्षातून दोनदा जिल्हा दौऱ्यावर येतात आणि निघून जातात. त्यामुळे गडचिरोली हे पालकमंत्र्यांसाठी केवळ टुरिझमचे ठिकाण असल्याचे दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असून त्यांचे सुद्धा जिल्ह्यातील समस्यांकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही. आता तरी सरकारने टुरिझम सोडून तातडीने जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष घालून कोनसरी प्रकल्प सुरू करण्यासह इतर सर्व समस्या तातडीने सोडवाव्या. अशी मागणी केली आहे.
लॉयड्स मेटल्स कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
सुरजागड खाणीतून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्समुळे झालेल्या अपघातांची सखोल चौकशी करून लॉयड्स मेटल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कंपनीच्या मनमानी कारभारावर आळा बसवावा. अन्यथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी
सुरजागड मध्ये चालणाऱ्या जड वाहतुकीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यांची सहा महिन्याच्या आत दुरुस्ती करण्यात यावी म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आष्टी येथे चक्काजाम आंदोलन केले होते. हा सहा महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असताना अद्यापही आष्टी ते सिरोंचा महामार्गाचे काम झाल्याचे दिसत नाही. कोनसरी प्रकल्पाचेही काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोहखनिज बाहेर जिल्ह्यात आणि राज्यात विकल्या जात आहे. त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना कुठलाही फायदा होत नाही. त्याचे नुकसान मात्र जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागत असून अनेक युवकांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक नागरिकांचा जीवही गेलेला आहे, सुरजागड प्रकल्प सुरु झाल्यापासून महिलांवर, आदिवासी बांधवांवरील अन्याय, अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. खदान परिसरातील गाळ आणि धुळीमुळे शेतीचे, पर्यावरणाचे व वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. लॉयड्स मेटल्सच्या कोनसरी प्रकल्पातील लोकांवर दबावतंत्र वापरून बळजबरीने त्यांच्या जमिनी बळकवल्या जात आहेत.
अवघ्या एक दीड महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे जर आता रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर परत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.