जिल्ह्यात केंद्रीय चमूचा दुसरा दिवस, अहेरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०३ ऑगस्ट
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात शेती पिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी व आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाचे विशेष पथक मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले असून मंगळवारी सिरोंचा व बुधवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पथकाने अहेरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या पथकाने अहेरी तालुक्यातील देवलमरी, वद्रा व आवलमटि या गावांना भेट देऊन तेथील शेतकरी, सरपंच, ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. झालेले पिकांचे नुकसान, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान तसेच जिवीत हानी याची माहिती घेतली. तालुक्यातील ३३९९.५४ हे.आर. क्षेत्र बाधित झाले. तसेच २०९४ घरांचे अंशत: नुकसान झाले असून ७ घरांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. तसेच जनावरे व मनुष्यहानीही झाली. ही सर्व माहिती केंद्रीय पथकातील सदस्यांनी जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, अहेरी उपविभागीय अधिकारी अंकित, उपविभागीय कृषि अधिकारी आनंद गंजेवार, अहेरीचे तहसीलदार ओमकार ओतारी, गटविकास अधिकारी प्रतिक चन्नावार, तालुका आरोग्य अधिकारी किरण वानखेडे, पशुवैद्यकिय अधिकारी पवन पावडे, तालुका कृषि अधिकारी संदेश खरात, अहेरी मुख्याधिकारी अजय साळवे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मेश्राम आदी उपस्थित होते.