गडचिरोलीत संततधार; भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला
सर्व नदी,नाले फुगले, रेगडी डॅम ओव्हरफ्लो

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१८ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भामरागड सह तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली- भामरागड मार्गही अनेक ठिकाणी नाल्यांवर पूर आल्यामुळे पूर्णपणे बंद पडला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीची नक्षत्र कोरडीच गेली. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून १७ जुलै पासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. १७ जुलै सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील वैनगंगा,कठाणी,गाढवी, प्राणहिता, गोदावरी, बांडीया, पामुलगौतम, पर्लकोटा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पर्लकोटानदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद झाला आहे. यामुळे जवळपास १०० गावे आणि पाडे संपर्क विहीन झाली. दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या पावसाळ्यात पहिल्यांदाच भामरागड तालुक्याचा संपर्क तुटल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० डी वर अनेक छोटे-मोठे नदी-नाले असून ते तुडुंब भरल्यामुळे पूल आणि रपटे पाण्याखाली गेले असल्याने मुळे हा मार्ग बंद झाला आहे.
गडचिरोली जिल्हा पूर नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहिती नुसार वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी २१ गेट अर्धा मीटरने उघडलेले असु न८५७४५ क्युसेक्स विसर्ग आहे. चिचडोह बॅरेज चे ३८ पैकी सर्व ३८ गेट उघडलेले असुन विसर्ग २७७७८८ क्युसेक्स आहे. वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ३१ गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे. बामणी व सिरपूर/सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. दिना प्रकल्प १०० भरला असुन सांडव्यावरुन ६० सेंमी ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीवरील श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे ६२पैकी सर्व ६२ गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ३५ दरवाजे उघडलेले असुन विसर्ग २०२२४० क्युसेक्स आहे. बॅरेज ची पाणी पातळी ९८.३० मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या २ मी. ने खाली आहे. कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार पुलाच्या वर आहे.
जिल्हयात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि धरणांचे व बॅरएजएसचए पाणी सोडण्यात आल्याने बॅकवॉटर मुळे स्थानिक नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. मुख्य नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसीखुर्द धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याने वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, तसेच इंद्रावती या मुख्य नद्यांसह जिल्ह्यातील उपनद्यांचीही पाणी पातळी वाढलेली आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाचे नागपूर, हैद्राबाद, रायपूर व भोपाल केंद्र यांचे सोमवारच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार पुढील २४ तासात वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी उपखोऱ्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे.