मला मोठा पोर्टफोलिओ पाहिजे हे सांगायला अजित पवार यांना सहा महिने कां लागले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांचे अजित पवारांना प्रत्यूत्तर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२ डिसेंबर
मला मोठा पोर्टफोलिओ पाहिजे हे सांगायला अजित पवार यांना सहा महिने कां लागले?. ते सरकार मध्ये गेल्यावर लागलीच कां नाही सांगितले. असा उलट प्रश्न राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे विदर्भातील प्रमुख नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला. ते काल शुक्रवारी गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी आले होते. या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री देशमुख पुढे म्हणाले की अजित पवार यांनी त्यांचे सोबत यावे यासाठी अनेक प्रयत्न केले. मोठमोठ्या ऑफर्स दिल्या. परंतु मी माझ्या ८३ वर्षांच्या बापाला सोडून जाणार नाही. हे ठामपणे सांगितले. यासोबतच ज्या पक्षाने मला निष्कारण तुरुंगात डांबले, त्यापक्षासोबत जाणे कदापिही शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ पदाधिकारी अजित पवार यांच्या नेतृत्वात वेगळा गट स्थापन करणार याची माहिती आम्हाला आधीच होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि मी त्यांच्या बैठकांमध्ये जाऊन त्यांना बंड करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ते गडचिरोलीत शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या कबुलीमुळे अजित पवारांचे बंड हे एकाएकी घडलेले नव्हते हे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना जागरूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले.
विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेला युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा संघर्ष यात्रेचे समन्वयक रविकांत वरपे, पक्षाचे निरीक्षक राजेंद्र वैद्य, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, ज्येष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, सुरेश गुडधे, एड. संजय ठाकरे, विजय गोरडवार, श्याम धाईत, प्रकाश ताकसांडे, शेमदेव चापले आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
२२ ऑक्टोबरला पुणे येथून आ.रोहीत पवार यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ही संघर्ष यात्रा २५ दिवसात ८०० किलोमीटरचा प्रवास करत (पायी) १२ डिसेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपुरात पक्षाध्यक्ष शरद पवार या यात्रेला मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संघर्ष यात्रेतून कंत्राटी कायदा रद्द करा, पोलिस भरती करा, कोणतीही सरकारी भरती खासगी कंपन्यांमार्फत करू नका अशा २५ मागण्या केल्या जात असल्याचे रविकांत वरपे यांनी यावेळी सांगितले.